कोल्हापूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथे कुरुंदवाड ते पाच मैल चौक जाणाऱ्या रोडवर हेरवाड बसस्टॉपसमोर सापळा रचून दोघा संशयितांकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, २७ काडतुसे पोलिसांनी जप्त केले. विजय गणपती कुडचे (वय ३५), प्रदीप लहू धाबडे (२६ दोघेही रा. इंगळी, ता. चिक्कोडी) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५२ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणूक शांतता आणि भयमुक्त वातावरण पार पडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांची माहिती गोळा करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.
पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांना हेरवाड (ता. शिरोळ) परिसरात दोघे जण गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. कुरुंदवाड ते पाच मैल चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हेरवाड बसस्टॉप येथे संशयित विजय कुडचे आणि प्रदीप धाबडे थांबले असता त्यांना अटक केली. त्याच्या ताब्यातून १ गावठी बनावटीचे पिस्तूल, २७ काडतुसे असा सुमारे ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
त्यांच्यावर कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पिस्तुल आनले कोठून, ते कोणाला विक्री करणार होते, याची चौकशी सुरु आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, विजय कारंडे, सचिन गुरखे, उत्तम सडोलीकर, किरण गावडे, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, संजय पडवळ, प्रदीप पवार, नेताजी डोंगरे, सचिन पाटील, नामदेव यादव, रणजित कांबळे, विलास किरोळकर, अनिल पास्ते आदींचा सहभाग होता.नागरिकांना आवाहनआचारसंहितेच्या अनुषंगाने परिसरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दहशत माजविणे, गुन्हेगारी टोळीची माहिती मिळाल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे संपर्क साधावा. नागरिकांनी ०२३१-२६६५६१७ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.