कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भेदणारे मोबाईल प्रकरण राज्यभर गाजत असतानाच सोमवारी पुन्हा कारागृहातील मोक्का कारवाईतील पाच संशयित आरोपींकडे एक सीमकार्डसह दोन मोबाईल व दोन बॅटऱ्या सापडल्या. सीसी कॅमेऱ्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला. याबाबत मोक्कातील पाच संशयितांवर मंगळवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झालेले मोक्कातील आरोपी : विकास रामआवतार खंडेलवाल, अभिमान विठठल माने, शुक्रराज पांडुरंग घाडगे, अक्षय अशोक गिरी, युवराज मोहनराव महाडिक (सद्या सर्व रा. कळंबा कारागृह).कळंबा कारागृहातील भक्कम मानली जाणारी सुरक्षा व्यवस्था भेदून आतील जहाल कैद्यांना मोबाईल, गांजा, चार्जींग बॅटऱ्या, चार्जर आदी वस्तू पोहोच होत असल्याचे प्रकरण गाजत आहे. याची गंभीर दखल घेऊन कारागृह अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तत्कालीन कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने बदलीही केली. परंतु त्यानंतरही कारागृहातील कैद्याकडे मोबाईल मिळून येऊ लागल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.
या वारंवर घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी कारागृहातील सर्व बराकची तपासणी केली. त्यावेळी मोका कारवाईतील पाच संशयितांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.त्यावेळी सर्कल नं. ४ मधील बराक नं. २ मधील विकास खंडेलवाल व अभिमान माने यांच्या अंगझडतीमध्ये त्यांनी मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी स्वच्छतागृहातून लपवून ठेवलेला सीमकार्डसह मोबाईल काढून दिला.त्यानंतर सर्कल नं. ५ बराक नं. १ मधील शुक्रराज घाडगे, युवराज महाडिक, अक्षय गिरी या तिघांची झडती घेतली, तिघांनीही चौकशीत उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी संपूर्ण बराकची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्या अंथरुणातील उशीमध्ये मोबाईलच्या दोन बॅटऱ्या व महाडिक याच्या पॅन्टच्या खिशात लपवलेला विनासीम मोबाईल सापडला. याबाबत कारागृहातील वरिष्ठ तरुंगाधिकारी एस. एल. आडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संबंधीत पाच मोकातील संशयितांवर गुन्हे नोेंदवले.मोबाईल लपवण्यासाठी स्वच्छतागृहाचा वापरसर्कल नं. ४ बराक नं. २ मधील दोघा कैद्यांनी दुधाच्या पिशवीत मोबाईल गुंडाळून तो बराकमागील स्वच्छतागृहातील पाण्यात लपवून ठेवल्याचे आढळले.प्रथमच सीमकार्ड सापडले, अनेकांचे कारनामे उघड होणारजप्त दोनपैकी एका मोबाईलमध्ये चालू सीम कार्ड आढळले. आतापर्यंत प्रथमच सीम कार्ड आढळल्याने त्याद्वारे तपासणीत कारागृहातील अनेक कारनामे उघडकीस घेण्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.एक सीमकार्ड, दोन मोबाईलचा पाचही कैद्यांकडून वापरकारागृहातील मोकातील पाचही आरोपींच्या संशयास्पद हालचाली दिसल्याने कारागृह अधीक्षक इंदूरकर यांनी सीसी टीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी पाचही जणांनी एकच सीमकार्ड दोन मोबाईलमध्ये घालून ते वापरल्याचे दिसून आले, त्यानुसार झडती घेऊन कारवाई केली.
वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सोमवारी बराकची तपासणी मोहीम घेतली. पाचही कैद्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी केल्याने प्रकार उघड झाला. पाचही जणांवर गुन्हा दाखल केला.- चंदमणी इंदूरकर,अधीक्षक, कळंबा कारागृह, कोल्हापूर