गारगोटी : गर्भलिंग निदान प्रकरणात शुक्रवारी आणखी दोन संशयितांना भुदरगड पोलिसांनी अटक केली आहे. दिगंबर मारुती किल्लेदार (४३) आणि शिला श्यामराव माने (४०, दोघेही रा. तिटवे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.तपासाचे धागेदोरे भुदरगड, कागल, राधानगरी असा प्रवास करीत आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या तिटवे येथील दोन संशयितांना भुदरगड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. पोलिसांनी चालविलेल्या धडक तपास मोहिमेने महिलेसह चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासामुळे अवघ्या दोन दिवसांत चार आरोपींना अटक करून याप्रकरणी लक्षणीय कामगिरी बजावली आहे.मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे गर्भलिंग निदान चाचणी करताना रंगेहाथ पकडलेला संशयित विजय लक्ष्मण कोळस्कर हा सध्या पोलिस कोठडीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केलेल्या दोन संशयित आरोपींमध्ये इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर बाबूराव दत्तू पाटील (५२, रा. बामणे, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि दुसरा सागर शिवाजी बचाटे (३९, रा. सोनाळी, ता. कागल, जि. कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले.डॉ. बाबूराव पाटील हा गिऱ्हाईक हेरून विजयकडे पाठवित असे. त्याच्या मदतीला सागर बचाटे असे. अशाच प्रकारे तिटवे येथील दोन संशयित आरोपी दिगंबर किल्लेदार आणि शीला माने हीदेखील गर्भलिंग निदान तपासणीसाठी गिऱ्हाईक हेरून पाठवत असत.
किल्लेदार आणि माने हे दोघे गर्भलिंग तपासणीनंतर संबंधित महिलेचा गर्भपात करण्याची जबाबदारी पार पाडत असत. याच आरोपाखाली त्यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती; पण आठ महिन्यापासून ते जामिनावर मुक्त झाले होते. जामीन मिळाल्यावर त्यांनी पुन्हा गोरखधंदा सुरू केला.