कोल्हापूर : गेल्या तीन दिवसापासून कोल्हापुरात ठाण मांडलेल्या गव्याने अक्षरश: वनअधिकाऱ्यासह नागरिकांना हैराण करुन सोडले आहे. सर्वात आधी पंचगंगा नदीघाट परिसरात ठाण मांडलेल्या या गव्याने भुयेवाडी, वडणगे यानंतर आता शहरात मुक्त संचार सुरु केला आहे. हा गवा आता कसबा बावडा, भोसलेवाडी परिसरात वावरत असून वनअधिकाऱ्यांना चकवा देत आहे. या गव्याला वनअधिवासात सोडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असतानाच आज पुन्हा दोन गव्यांचे दर्शन झाले आहे.वडणगे (ता. करवीर) येथील झाडवाट गवताच्या कुरणात आज सकाळी गव्याचे पुन्हा दर्शन झाले. तर दुसरीकडे पाणंद येथेही दुसरा गवा निर्दशनास आला. कोल्हापूर परिसरात रोज वेगळ्या ठिकाणी गव्यांचा वावर आढळून येत असल्याने भीती व्यक्त होत आहे. तर गव्याचा वावर असलेल्या परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सर्वत्र व्हायरल होत आहेत.गवे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे वनविभागाकडून या गव्यांना वनअधिवासात सोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांना शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वन खात्याच्या ३५ जणांच्या पथकाने काल, बुधवारी दिवसभर विशेष प्रयत्न केले. गेले काही दिवस कोल्हापूर शहरासह परिसरात गव्याच्या दर्शनाने सर्वसामान्यांची भंबेरी उडाली आहे.
कोल्हापुरात गव्यांचा ठाण; आणखीन दोन गव्यांचे दर्शन, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:15 PM