कोल्हापूर : शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (वय ५०, सध्या रा. पुणे) या दोघांवर शाहूपुरी पोलिसांत लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. पाणी योजनेच्या पूर्ण केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिल करून देण्यासाठी दोन लाख व बिलावर सही करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
या लाचेपैकी तुकाराम मंगल यांनी एक लाख रुपये व उपअभियंता कांबळे यांना ५० हजार रुपये द्यावेत व बिल मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावी, अशी मागणी केल्याचे पंचासमक्ष पडताळणी केली असता निष्पन्न झाले. कांबळे यानेही लाच मागितल्याचे २ जून २०१८ला पंचासमक्ष पडताळणी केल्यावर स्पष्ट झाले होते.
कुणकुण लागल्याने पुढे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कांबळे याने २२ जून २०१८ ला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा १६ जुलै २०१८ ला शिरोळ पंचायत समिती कार्यालयात त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही. तथापि, तपासात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारतर्फे पोलीस फिर्यादी झाले.
त्या आधारे संशयित तुकाराम मंगल व अशोक कांबळे यांच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस हवालदार मनोज खोत, शरद पोरे, संदीप पावलेकर यांनी केली.लाचेसाठी घेतले आगावू चेकतडजोडीअंती कांबळे याने एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली; परंतु तक्रारदार यांनी झालेल्या कामाचे बिल न मिळाल्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर कळस म्हणजे, कांबळे याने तेवढ्या रकमेचे चेक मागितले व हे चेक घेतल्यावरच त्याने मूल्यांकनावर स्वाक्षºया केल्याचे व नमूद मूल्यांकनावर पूर्वीच्या तारखा टाकल्याचे निष्पन्न झाले.