लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक प्रवेशास मदत करून, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणारी श्रेयस ट्रॅव्हल बस व खासगी मॅक्सिमो कॅब अशी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर बसचे दोन चालक एक क्लीनर व कॅबचा चालक अशा चौघांना ताब्यात घेऊन ट्रॅव्हल्स मॅनेजर सह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस चालक वामन गोविंदा सोनकांबळे (वय ५२, रा.हेरा ता.उदगीर, जि.लातूर, सध्या रा. पुणे), लहू शंकर लांडगे (वय २५, रा.लातूर), बस क्लीनर योगेश शिवाजी कणीरे (वय २१, रा.विद्यानगर हुबळी), कॅब चालक नितीन कृष्णात गोडाप्पा (वय २७, रा.आप्पाचीवाडी ता.निपाणी) व अनुपस्थित असणारा विलास नामक ट्रॅव्हल्स मॅनेजर अशी गुन्हा दाखल करून, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय कर्नाटक राज्यातील प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे, परंतु काही आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी स्थानिक खासगी वाहनांचा वापर करून, आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची खुष्कीच्या मार्गाने सीमा पार करून घेतली जाते. त्यानंतर, परत ट्रॅव्हल्समधून पुढील प्रवास केला जातो. अशा महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणाऱ्या श्रेयस ट्रॅव्हल्समधून १७ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी ९ व्यक्तींकडे निगेटिव्ह अहवाल नसल्याने त्यांना कागल येथे उतरविण्यात आले. त्यांना मॅक्सिमो चालकाने खुष्कीच्या मार्गाने सौंदलगा नजीकच्या मांगूर फाटा या ठिकाणापर्यंत आणले. तिथून पुढे पुन्हा बसने प्रवास करीत असताना, पोलिसांनी छापा टाकून या दोन्ही वाहनांसह चार व्यक्तींना ताब्यात घेतले.
फोटो ओळ : आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक प्रवेशास मदत करणारी दोन वाहने व चौघांना निपाणी पोलिसांनी ताब्यात घेतले.