गडहिंग्लज : उन्हाळी भुईमुगाची वेल आणून दारात टाकताना ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर उतारतीच्या दिशेने दोन फर्लांग अंतरापर्यंत फरफटत गेला. त्या ट्रॅक्टरच्या इंजिनखाली सापडून ट्रॅक्टरचालक धैर्यशील दत्तात्रय देसाई (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या शेजारी बसलेले शेतकरी रमेश शंकर गायकवाड (४५) हे ट्रॉलीखाली सापडून गंभीर झाल्याने उपचारासाठी गडहिंग्लजला आणताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथे सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.ग्रामस्थ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी रमेश गायकवाड यांनी उन्हाळी भुईमूग लावली होती. भुईमूगाची वेल घरी आणण्यासाठी देसाई यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २४, डी ४४९७) घेऊन ते शेताकडे गेले होते.भुईमुगाची वेल ट्रॉलीतून घरी आणल्यानंतर दारात ब्रेक लावून ट्रॅक्टर थांबवत असताना ब्रेक लागला नाही. त्यामुळे उताराच्या दिशेने वेगाने पुढे जावून ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरच्या इंजिनखाली सापडल्याने धैर्यशील याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेले रमेश यांना गडहिंग्लजला आणताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.रमेश हे प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष आणि ज्ञानदीप वाचनालयाचे सचिव म्हणून ते काम पाहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी पाण्याच्या टाकीनजीक नवीन घर बांधले आहे. त्यांच्या घरासमोरून भादवणवाडीकडे जाणारा कच्चा रस्ता उतारतीचा आहे. उतारतीच्या रस्त्यावर बे्रक न लागल्यामुळे हा अपघात घडला. रमेश यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, तीन बहिणी, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धैर्यशील हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.कुटुंबांचा आधार गेला !रमेश यांचे वडील शंकर हे मुंबईत गिरणी कामगार होते. वाणिज्य शाखेची पदवी घेऊन देखील रमेश हे शेतीत रमले होते. स्वत:ची शेती उत्तमरित्या कसण्याबरोबरच ऊसतोडणीच्या कामासह अन्यत्र शेतमजुरीलाही ते जात होते. घरानजीकच झालेल्या अपघातात कर्त्या पुरुषाच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांसह कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
हिरलगेत ट्रॅक्टरखाली सापडून दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:58 AM