इचलकरंजी : चंदूर (ता.हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखान्यात वीज जोडणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. लाईनमन रज्जाक हुसेन तांबोळी (वय ५०, रा. भारतनगर मिरज) याला रंगेहात पकडले, तर बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश शंकर किटे(३३, रा.धुळेश्वरनगर कबनूर) याला गुन्ह्यातील सहभागाबद्दल ताब्यात घेतले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला.चंदूर येथील शाहूनगरमध्ये हकीब पानारी हे यंत्रमाग कारखाना सुरू करणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावतीने एका इलेक्ट्रिक ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या चंदूर कार्यालयात वीज जोडणी मागणीचा अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून २६ अश्वशक्तीची जोडणी मंजूर करून घेतली. त्यासाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रिकल पेटी, मीटर, आदींची जोडणी करण्यात आली. परंतु आर्थिक तडजोडीसाठी खांबावरून वीज जोडणी देणे बाकी राहिले होते.यासंदर्भात ३० ऑक्टोबरला तक्रारदाराने चंदूर कार्यालयातील लाईनमन तांबोळी याची भेट घेतली. त्यावेळी त्याच्यावतीने किटे याने तक्रारदारास वीज जोडणी देण्यासाठी तांबोळी याच्यासाठी सात हजार रुपये द्यावे लागतील; अन्यथा जोडणी मिळणार नाही, असे सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने तडजोड करण्याची मागणी केली. त्यामुळे तांबोळी याने पाच हजार रुपये द्या. लगेच जोडून देतो, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची पडताळणी केली असता तांबोळी याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये स्वीकारताना रज्जाक तांबोळी याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, कृष्णा पाटील, गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.
Kolhapur: वीज जोडणीसाठी घेतली पाच हजाराची लाच, महावितरणचे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 6:33 PM