कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर केंद्रातूनही दोन नाटके अंतिम फेरीसाठी जाणार आहेत.
‘लोकमत’ने ५ नोव्हेंबरला राज्य नाट्यच्या अंतिमसाठी हवीत दोन नाटके असे वृत्त दिले होते. फक्त त्यासंबंधीचा अधिकृत आदेश न निघाल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता. आता प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्याचा मार्गही मोकळा झाला.
हौशी रंगभूमी चळवळ जपण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यातील एकूण १९ केंद्रांवर ही स्पर्धा पार पडली. कोल्हापुरात ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात ही स्पर्धा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली.
तब्बल १८ संघांनी त्यामध्ये भाग घेतला. स्पर्धेची प्राथमिक फेरी संपली की दुसऱ्याच दिवशी परीक्षकांकडून संयोजकांना निकाल दिला जातो. त्यांच्याकडून तो सांस्कृतिक विभागाकडे जाऊन अधिकृतरीत्या प्रसिद्ध केला जातो. या प्रक्रियेला फार तर दोन ते तीन दिवस लागतात. मात्र स्पर्धा संपून आठ दिवस झाले तरी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला नव्हता.
अगदी सुरुवातीला एका केंद्रावरील आठ नाटकांमागे एक नाटक या प्रमाणात अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड केली जात असे. मात्र नंतर कितीही नाटके सादर झाली तरी त्यातील एकच नाटक पाठविले जाऊ लागले.
सध्या रंगभूमीची नवी वाटचाल सुरू असलेल्या अनेक हौशी संस्थांकडून दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले जाते. पहिल्या क्रमांकासाठी अठरा ते वीस संघांमध्ये स्पर्धा लागते. काही वेळा एक-दोन गुणांच्या फरकाने त्यांची अंतिम फेरीसाठी निवड हुकते. असे होऊ नये यासाठी संघांनी दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविण्यात यावीत, अशी मागणी होती.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एका केंद्रावर पंधरापेक्षा जास्त नाटके सादर होत असतील तर दोन नाटके अंतिमसाठी स्वीकारली जातील, असे जाहीर केले होते त्याचा अधिकृत आदेश निघाल्याने दोन नाटकांना अंतिम साठी संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.