कोल्हापूर : स्पोर्ट्स बाइक चोरीच्या गुन्ह्यात अडकवून मोक्कांतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोघा पोलिसांनाकोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातच रंगेहात पकडले.
विजय केरबा कारंडे (वय ५०, रा. चौगुलेपार, टेंबलाईवाडी, उचगाव) व किरण धोंडिराम गावडे (रा. केदारनगर, मोरेवाडी) अशी संशयित लाचखोर पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे अनुक्रमे ठाणे अंमलदार व नाईक म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी सांगितले, कोल्हापूर जिल्ह्यातील वकील पुत्राने आठ दिवसांपूर्वी वापरलेल्या स्पोर्ट्स बाइक खरेदी करून कोल्हापुरात आणल्या. त्या दुचाकी स्क्रॅप करण्याकरिता रीतसर आरटीओचे परवानेही घेतले होते. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस संशयित विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी त्या वकीलपुत्रास चौकशीच्या नावाखाली गाठले. पुण्या-मुंबईतून चोरीच्या स्पोर्ट्स बाइक आणून कोल्हापुरात विकतोस काय, असा जाब विचारला.
तुला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का लावतो. तुझी बदनामी करतो, अशी धमकी देऊन हे प्रकरण मिटवायचे असल्यास २५ लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा कारवाई करू, असे म्हणत संशयित दोघांनी त्यास मंगळवारी (दि. १८) आणि बुधवारी (दि. १९) पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये बोलावून घेतले. त्यामुळे हा वकीलपुत्र घाबरला.
अखेर हे प्रकरणात दहा लाख रुपये देण्यासाठी त्याने शुक्रवारपर्यंत मुदत द्यावी. बँकेतून पैसे काढतो आणि देतो असा वायदा केला. दरम्यान, त्याच्या वडिलांनी व त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत अलंकार हाॅल परेड मैदानालगत पडताळणी केली.
यामध्ये संशयितांनी दहा लाख रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत पुढे आले. दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या खालील बाजूस एक खाद्यपदार्थाची गाडीजवळ पंच साक्षीदारांसमोर दहा लाख रुपयांची रोकड घेऊन संशयित कारंडे व गावडे यांनी ती रक्कम आपल्या चारचाकीच्या डिकीत ठेवली.
याच दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोघांना रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस नाईक विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, रूपेश माने, सूरज अपराध यांनी केली.
कारवाईदरम्यान झाली झटापट
दहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलो गेल्याचे लक्षात येताच संशयित कारंडे यांनी पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसडा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच परिसरात पुन्हा पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले. पकडताना कर्मचारी व कारंडे यांच्यात मोठी झटापट झाली. याचीच चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कारवाईनंतर सुरू होती.