कोल्हापूर : कुख्यात मटका व्यवसायिक सलीम मुल्ला याच्या आश्रयाने यादवनगर येथे उभारलेल्या दोन मंडळाच्या आरसीसी इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरश: पिटाळून लावले.प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षिका ऐश्वर्या शर्मा या मटका व्यवसायिक सलीम मुल्ला याच्या घरावर छापा टाकायला गेल्या असता त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिस खात्याने मनावर घेऊन मुल्ला याचे कंबरडे मोडण्यास सुरवात केली आहे. सलीम व व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करुन दोघांना कारागृहात डांबल्यानंतर आता यादवनगरातील त्याचे घर तसेच दोन मंडळाच्या इमारती ‘रडार’ वर आल्या होत्या.शहर पोलिस उपाधीक्षिका प्रेरणा कट्टे यांनी सलीम मुल्ला याचा आश्रय लाभलेल्या इंडियन ग्रुप व शिवशक्ती मंडळाच्या इमारती विरोधात थेट महापालिकेकडे तक्रार केली होती. दोन्ही मंडळांनी बांधलेल्या आरसीसी इमारती सार्वजनिक रस्त्यावर विना परवाना बांधल्या होत्या. या इमारतीत गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंदे चालत होते.
राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडून दोन्ही मंडळांच्या इमारतींची पाहणी करण्यात आली. महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करुन बांधल्याचे तसेच त्यास कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पाहणीत आढळून आले. मंगळवारी राजारामपुरी विभागीय कार्यालयातर्फे सदरचे बांधकाम चोवीस तासात बांधकाम उतरुन घ्यावे म्हणून नोटीस बजावली होती. बुधवारी सायंकाळी त्याची मुदत संपली. त्यामुळे गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष कारवाई सुरु करण्यात आली.उपशहर अभियंता आर. के. जाधव, शाखा अभियंता मिलिंद जाधव, पद्मल पाटील, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख पंडीत पोवार यांच्यासह महापालिकेचे दोन जेसीबी, दोन डंपर, चाळीस कर्मचारी असा फौजफाटा यादवनगर येथे पोहचला. पोलिस उपाधीक्षिका कट्टे, राजारामपुरी पोलिस निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दाखल होताच महापालिका कर्मचाऱ्यांनी इमारती तोडण्यास सुरवात केली. सुमारे दीड तासात दोन्ही इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या. कोल्हापूरातील यादवनगर परिसरातील दोन मंडळाच्या बेकायदेशीर इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने गुरुवारी जेसीबीच्या सहायाने जमीनदोस्त केल्या. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता.