कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यासाठी बुधवारी कुमुदा शुगर्स प्रा. लि. बेळगाव व चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने अंतिम क्षणी निविदा दाखल केल्या. अकरा कंपन्यांनी निविदा फॉर्म खरेदी केले होते; पण केवळ दोघांनी दाखल केले. शनिवारी (दि. १९) जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी समितीची बैठक होत असून, त्यामध्ये निविदा उघडणार असल्याचे समजते. जिल्हा बॅँकेच्या ६५ कोटी कर्जासाठी ‘दौलत’ दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. दुर्वांकुर शुगर्स (मुंबई), नवजीवन शेती उद्योग (पुणे), देवीदास वाय. पाटील (बेळगाव), ग्रीन पॉवर्स शुगर्स (सातारा), शेतकरी संघ (कोल्हापूर), चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ, तासगावकर शुगर्स, कुमुदा शुगर्स, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना यांनी निविदा खरेदी केल्या होत्या. एक कोटी बयाणा रकमेसह निविदा दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. दुपारी चारनंतर कुमुदा शुगर्सच्या प्रतिनिधींनी निविदा दाखल केली. त्यानंतर जिल्हा बॅँकेतच दिवसभर तळ ठोकून बसलेले बॅँकेचे संचालक नरसिंंग गुरुनाथ पाटील यांनी साडेचारनंतर निविदा दाखल करण्याच्या हालचाली गतिमान केल्या. चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाच्या नावावर त्यांनी बयाणा रक्कम भरत शेवटच्या क्षणी निविदा दाखल केली. जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी समितीची बैठक शनिवारी होत आहे. यामध्ये निविदा उघडण्यात येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)निर्णय बारगळला : शेतकरी संघाची माघार्र$िं‘दौलत’ चालविण्यास घेण्यासाठी शेतकरी संघाने २० हजार रुपये भरून निविदा खरेदी केली होती. कारखाना चालविण्यास घेण्यावरून संचालक मंडळात दोन मतप्रवाह होते. अद्याप संघ सदृढ झाला नसताना साखर कारखाना चालविण्यास घेऊन तो पेलणार का? असा सवाल एका ज्येष्ठ संचालकाने केला. त्यामुळे निविदा दाखल करण्याचा निर्णय बारगळला.
‘दौलत’साठी दोन निविदा
By admin | Published: December 17, 2015 12:22 AM