कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिवाची पर्वा न करता राबणाऱ्या आरोग्य विभाग, पोलीस यांच्यासह गरजू लोकांचे पोट भरण्याचे काम ‘क्लीन फूड ट्रिटस’च्या वतीने सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन व्हावे यासाठी त्यांनी चपाती करण्याचे मशीन आणले आहे. रोज पाच हजार चपात्यांची त्याची क्षमता आहे. सध्या रोज दोन हजार चपात्या करून त्यांचे वाटप केले जातात.
कोल्हापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या ‘क्लीन फूड ट्रिटस’कडून सामाजिक बांधीलकी म्हणून गरजूंना फूड पॅकेटचे वाटप होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासनामधील राबणाऱ्यांच्या पोटाची सोय त्यांच्याकडून होत आहे. याचबरोबर परजिल्ह्यांतील कामगार, फिरस्ते यांनाही फूड पॅकेट दिली जात आहेत.
चपाती, भाजी, मसालेभात याचा समावेश असलेल्या ८०० फूड पॅकेटचे रोज वाटप होते. संचारबंदीमुळे जेवण करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर मशीनच्या माध्यमातून चपात्या केल्या जात आहेत. तासाला ५०० चपात्या तयार होतात. या उपक्रमाला जयेश कदम, राजू लिंग्रस, दिलीप देसाई, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, मदन मिरजकर, अरुण गावडे, विजय जाधव, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, अर्थमूव्हिंग असोसिएशन यांची मोलाची मदत होत आहे.
मशीनच्या माध्यमातून रोज दोन हजार चपात्या होतात. ‘क्लीन फूड ट्रिट’कडून ८०० फूड पॅकेटचे वाटप केले जाते. उर्वरित चपात्या जेवण पुरविणा-या सामाजिक संस्थांना मोफत दिल्या जातात. १० एप्रिलपासून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत ३४ हजारांपेक्षा जास्त चपात्यांचे वाटप केले आहे. जेवण करताना गर्दी होऊ नये म्हणून दोन ठिकाणी किचन रूम केल्या आहेत.- उमेश निगडे, माजी अध्यक्ष, कोल्हापूर अर्बन बँक