लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ यासाठी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दोन हजार क्विंटल कांदा पडून आहे. असोसिएशन, व्यापारी, समिती प्रशासन यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र दोघेही आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला आहे. उद्या, शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे संबंधित घटकांची बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत.
बाजार समितीत महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून रोज हजारो क्विंटल कांद्याची आवक होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून लॉरी ऑपरेटर्सच्या संपामुळे ही आवक विस्कळीत झाली आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे, सहायक निबंधक प्रदीप मालगावे, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे पदाधिकारी, बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली. मात्र, त्यामध्ये तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे समितीत दोन हजार क्विंटल कांदा पडून आहे.
आज पोलीस बंदोबस्तात ट्रक जाणार
आठ दिवस कांदा पडून राहिल्याने नुकसान होत असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हा कांदा बाहेर पाठविण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. गुरुवारी पोलीस बंदोबस्तात कांद्याचे ट्रक पाठविले जाणार आहेत.
कोट-
शेतकऱ्यांचा माल असल्याने आम्ही ट्रक देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, माल भरणी, उतरणी व वारणी देण्यास नकार दिल्याने चर्चा फिस्कटली. आतापर्यंत जबरदस्तीने हे सगळे ट्रक मालकांकडून घेतले जात होते, आता हे चालणार नाही.
- सुभाष जाधव (अध्यक्ष, कोल्हापूर लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन)