भोगावती : घोटवडे (ता. येथील) येथील एस. टी. स्टँड परिसरात असलेल्या दिमाखदार झाडांची बेकायदेशीररीत्या तोड करून पळविण्यात आली आहेत. ठेकेदाराने स्थानिकांच्या मदतीने हे काम केले आहे. वन व पाटबंधारे विभागाने या प्रकरणाकडे सोईस्कर दुर्लक्ष करून, एकमेकावर बाजू ढकलून आपआपला कारभार स्वच्छ असल्याचा दावा करत आहेत. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
कोल्हापूर-राधानगरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी लावलेली अनेक झाडे आहेत.
ही निसर्गसंपदा जपणे काळाची गरज असताना चिरीमिरी हातावर घेऊन तालुक्यात खुलेआम झाडांची कत्तल सुरू आहे.
येथील स्टँड परिसर म्हणजे नैसर्गिक बसथांबा असा होता. प्रवाशांसह वाटसरूंना त्याचा मोठा आधार होता. मात्र, तब्बल पंधरा फूट घेरीच्या असणाऱ्या दोन झाडांची बेकायदेशीररीत्या तोड करून त्याचे बुडके सोडून इतर झाडाचा विस्तार याची परस्पर विक्री केली आहे. तब्बल दोन ट्रक माल झाला होता. तो लाखो रुपये किमतीला विकण्यात आला. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.
"झाडे लावा, झाडे जगवा" अशी पोकळ घोषणा देऊन पावसाळ्यात वृक्षलागवडीचे अभियान राबविणाऱ्या वनविभागाने या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. पाटबंधारे व वनविभाग आपल्यावरील बाजू झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. एरवी सामान्य माणसांना झाडाची एखादी फांदी तोडल्याबद्दल कारवाई करणारा वनविभाग व पाटबंधारे विभाग गप्प का, असा सवालही निसर्गप्रेमींकडून विचारला जात आहे.
दरम्यान, वनअधिकारी एस. बी. बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाटबंधारे विभागाला याबाबत नोटीस काढली आहे. घोटवडे येथील रस्त्याच्या दुतर्फा झाडे व फांद्या तोडून त्याच्या विस्ताराची परस्पर विल्हेवाट लावली आहे. संबंधित ठेकेदाराची माहिती वनविभागाला तत्काळ द्यावी, वनविभागाकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, असे म्हटले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, या मार्गावर सध्या कोणतेही काम सुरू नाही किंवा टेंडरदेखील निघालेले नाही. त्यामुळे आम्ही ती झाडे तोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले.
फोटो ओळी:
घोटवडे (ता. राधानगरी) येथे बेकायदेशीर तोडलेली झाडे.