घन:शाम कुंभार
यड्राव : आधारकार्डच्या संदर्भानुसार लसीकरण नोंद होते. त्यानुसार प्रत्यक्षात दोनदा लसीकरण झाले. दुसऱ्या लसीकरणाची तारीख पहिले लसीकरण म्हणून नोंद झाली, तर अंतिम प्रमाणपत्रावर दुसरी लस न घेतलेल्या तारखेबरोबरच आडनाव चुकीचे नमूद असल्याने लसीकरणाच्या संगणक प्रणालीचा सावळागोंधळ उघड झाला आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र भविष्यात उपयोगी असल्याने प्रत्यक्षात झालेले लसीकरण की न झालेल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र ठेवायचे, हा संभ्रम कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील राजासाहेब पीरसाहेब बुराण यांना होत आहे.
राजासाहेब बुराण यांनी प्रत्यक्षात ३१ मार्चरोजी केअर हॉस्पिटल, कोरोची येथे पहिले लसीकरण व १० मे रोजी कोंडिग्रे येथे दुसरे लसीकरण करून घेतले. दोन्ही लसीच्या प्रोव्हिजनल प्रमाणपत्रावर पहिला डोस असाच उल्लेख आहे, तर दुसरा डोस ३० ऑगस्टपर्यंत घ्यावा, अशी १० मे रोजी घेतलेल्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नोंद आहे.
लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र काढले असता, १० मे रोजी पहिला डोस व २० ऑगस्टला दुसरा डोस झाल्याचा उल्लेख असून, या आडनावामध्ये बुराणऐवजी बुरून असा चुकीचा उल्लेख आहे. ३१ मार्चला प्रत्यक्षात लस घेऊनही त्याची प्रमाणपत्रावर नोंद नाही, तर १० मे रोजी दुसरे लसीकरण झाले त्याची अंतिम प्रमाणपत्रावर पहिली लस असे नमूद झाले आहे व जे प्रत्यक्षात लसीकरण झालेच नाही, ती २० ऑगस्ट तारीख प्रमाणपत्रावर दुसऱ्या लसीकरणाची म्हणून नमूद झाली आहे. यामुळे लसीकरणाच्या संगणक प्रणालीचा सावळागोंधळ उघड झाला आहे. याचा विचित्र अनुभव बुराण यांना आला आहे; तर भविष्यात प्रत्यक्षात झालेले लसीकरणाचे की न झालेल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र जपून ठेवायचे, याबाबत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.