शिरोली : पुणे-बंगलोर महामार्गावर शिये फाटा येथे मालवाहू ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने देवकर पाणंद येथील दुचाकीवरील महिला जागीच ठार, तर तिची दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. सुवर्णा अरुण कोपार्डेकर (वय ३६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर देवराज कोपार्डेकर (८) व भूमी कोपार्डेकर (१२) अशी मुलांची नावे आहेत. हा अपघात सकाळी साडेनऊ वाजता झाला. पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आज, मंगळवारी सकाळी सात वाजता देवकर पाणंद येथील सुवर्णा कोपार्डेकर या दुचाकीवरून कऱ्हाडहून देवराज व भूमी यांना घेऊन कोल्हापूरकडे येत होत्या. शिये फाटा येथे आल्यावर पुण्याहून बंगलोरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या व्हीआरएल लॉजेस्टिक कंपनीच्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यांना सुमारे शंभर फूट फरफटत नेले. त्यामुळे सुवर्णा कोपार्डेकर ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडल्याने जागीच ठार झाल्या, तर देवराज व भूमी हे बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. जखमींवर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. ट्रकचालक भूयुप्पा कल्लप पुरी (२५, रा. सौदत्ती कर्नाटक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (वार्ताहर)
मालवाहू ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार
By admin | Published: June 26, 2016 1:42 AM