कोल्हापूर : रस्त्याकडेला उभ्या केलेल्या आलिशान चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांतील कार टेप चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.
जुबेर रईस अहमद (वय ३१, रा. नालासोपारा (ईस्ट) पालघर, मूळ रा. तेहरवा नवाद, जि. बलरामपूर, रा. उत्तरप्रदेश), जगन्नाथ रामनाथ सरोज (४५, रा. बेघर रूम झोपडपट्टी, सिद्धार्थ कॉलनी रोड, चेंबूर नाका, मुंबई, मूळ रा. राणीगंज, जि. प्रतापगड, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १० गुन्हे उघडकीस आले असून चार लाख रुपये किमतीचे २० कार टेप जप्त केले.जिल्ह्यात काही दिवसांपासून रस्त्याकडेला उभ्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांतील कार टेप चोरीच्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करीत होते. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या माध्यमातून साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, राजेश आडुळकर, अजय वाडेकर, नितीन चोथे, संदीप कुंभार, सागर कांडगावे, ओंकार परब यांनी रात्र गस्तीदरम्यान महामार्गावर बऱ्याच दिवसांपासून लक्ष ठेवले होते.गोपनीय माहीतगारामार्फत या कार टेप चोरट्यांचा माग काढण्यात पथकाला सोमवारी (दि. १६) यश मिळाले. मुंबईवरून आलेली एक सोनेरी रंगाची कार शिये फाटा येथे थांबली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने रात्रगस्त घालताना या वाहनातील जुबेर अहमद आणि जगन्नाथ सरोज या दोघांकडे चौकशी सुरू केली. त्यांनी संशयास्पद उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी कार टेप चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान चौकशीत त्या दोघा सराईत चोरट्यांकडून १० गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडील चार लाख रुपये किमतीचे २० कार टेप पोलिसांनी जप्त केले आहेत.रात्रीत मुंबई टू कोल्हापूरहे सराईत दोघे चोरटे रात्रीच मुंबईतून कोल्हापुरात येऊन रस्त्याकडेच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांतील कार टेपची चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.