राधानगरी : राधानगरी वन्यजीव विभागाच्या वाकीघोल परिसरातील वन्य क्षेत्रात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या शिकारप्रकरणी वन्यजीव विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी सोमवारी ही कारवाई केली. तसेच याच प्रकरणातील संशयित नऊजणांवर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयातून एक दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. भांडणे परिसरातील अभयारण्यात १२ नोव्हेंबर २०१५ रोजी कैतान अगस्तीन डिसोझा, मनवेल दावित फर्नांडीस, फ्रान्सिस रुजाय पिंटो, अंथोन अगस्तीन डिसोझा, नेपोलीन रुजाय डिसोझा, जुमे मिशेल डिमेलो, जेम्स सालो परेरा (सर्व, रा. बाचणी, ता. कागल) व धोंडिराम रामचंद्र राणे (रा. लिंगाचीवाडी, ता. राधानगरी) यांनी विनापरवाना प्रवेश केला होता, तेथे त्यांनी जेवणही केले. याची माहिती मिळताच राधानगरी वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक सुरेश नारायण देशपांडे, वनपाल योगेश पुनाजी गावित व वनपाल शफिक गुलाब आगा यांनी तेथे जाऊन या सर्वांना तुम्ही वन्यप्राण्यांची शिकार केली असून, तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे धमकावले, तसेच धोंडिराम राणे यांची बंदूकही जप्त केली. त्यांच्यापैकी काहीजण सरकारी कर्मचारी असल्याने त्यांनी तडजोडीची तयारी दर्शवली. त्यानुसार एक लाख तीस हजार रुपयांवर तडजोड झाली. पैसे घेतल्यानंतर या कमर्चाऱ्यांनी राणे याची बंदूक परत दिली. तडजोडीनंतर हे प्रकरण मिटले होते. मात्र, कर्मचाऱ्यांपैकी एकाने येथील एका बारमध्ये मारलेल्या फुशारकीचे तेथील एकाने केलेले चित्रीकरण सोशल मीडियावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. येथील विभागीय वनाधिकारी एस. एल. झुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी शिकार केली नसतानाही त्यांना धमकावून व गुन्ह्याची भीती दाखवून पैसे उकळल्याचे कबूल केले होते. याप्रकरणी योगेश गावित व शफिक आगा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तर सहायक वनसंरक्षण अधिकारी सुरेश देशपांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘वन्यजीव’चे दोन कर्मचारी निलंबित
By admin | Published: January 05, 2016 1:11 AM