कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनील शामराव पाटील (वय ४२, रा. जवाहरनगर चौक, कोल्हापूर) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिला कॉन्स्टेबलना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. कोडोली पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल परवीन मुल्ला, सेफ सिटी विभागाकडील साऊताई चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. या दोघींची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.परवीन मुल्ला व साऊताई चव्हाण या दोघी गांधीनगर पोलीस ठाण्यात असताना हजेरी मास्तर म्हणून सुनील पाटील होता. आपल्या सोईप्रमाणे ड्युटी लावणे, साहेबाकडून रजा मंजूर करून घेणे, अशी कामे सुनील करीत होते; त्यामुळे या दोघींची त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली. त्यातून दोघीही त्यांच्यावर प्रेम करूलागल्या. यातून दोघींनी लग्नासाठी सुनील यांच्याकडे तगादा लावला होता. फोनवरून, प्रत्यक्ष घरी व पोलीस ठाण्यात येऊन दमदाटी सुरू होती. या रोजच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या तिघांचे मोबाईल कॉल डिटेल्स पोलिसांनी मागविले आहेत. मुल्ला ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुनील यांना भेटून दमदाटी करून गेली होती. तेथील पोलीस निरीक्षकांकडे चौकशी करण्यात आली. या दोघींनी त्यांना विवाह संस्थेत नेऊन लग्नाची नोंदणी करण्यास भाग पाडले होते. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा जबाबही घेण्याचे काम सुरू आहे. सुनील यांनी विषाची बाटली कोठून खरेदी केली. ज्या दिवशी त्यांनी विष पिले, त्या दिवशी मुल्ला व चव्हाण कोठे होत्या. असे पुरावे पोलीस गोळा करीत आहेत.संपर्कातील प्रत्येकाची होणार चौकशीमृत सुनीलसह संशयित मुल्ला व चव्हाण या तिघांच्या मोबाईलवर वारंवार पोलीस खात्यातील कोणाचे फोन झालेत, ते कशासाठी झालेत यासाठी त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले आहे; त्यामुळे पोलीस खात्यातील काहींचे धाबे दणाणले आहेत.
‘त्या’ दोन महिला कॉन्स्टेबल ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:46 AM