कोल्हापूर : महापुरात पाण्याने वेढलेल्या अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या एका दोन वर्षांच्या बाळासह त्याच्या आईलाही आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितस्थळी हलवले. रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली. एनडीआरएफच्या बहाद्दर जवानांइतकीच चांगली मदत कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथकाची या संकटाच्या काळात लोकांना चांगली मदत होत आहे.
विन्स रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर हे कुटुंब पाण्याने वेढले असतानाही थांबले होते. रविवारी मात्र पाणी कमी येत नसल्याचे पाहून त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मदत मागितली. या कक्षाचे पथक बोट घेऊन तिथे गेले आणि बाळ त्याची आई व त्यांचे सासू-सासरे यांना सुखरूप सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्याचवेळी महावीर बागेच्या मागील बाजूस असलेल्या एका अपार्टमेंटमधून अंथरूणास खिळलेल्या महिला रुग्णासही चौथ्या मजल्यावरून खाली आणून रुग्णालयात हलविण्यात या पथकाला यश आले. लोकांना कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असल्यास आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांच्या मदतीसाठी धावून येत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. त्यामुळेच देशाचे एनडीआरएफ तर कोल्हापूरचे केडीआरएफ लई भारी अशी भावना समाजमनातून व्यक्त होत आहे. यापूर्वी २०१९ च्या महापुरातही या पथकाने उत्तम सेवा बजावली होती. संकट कोणतेही असो, कोल्हापुरी माणूस मदतीला धावून जातो, तोच अनुभव या पथकाकडूनही येत आहे.