रवींद्र येसादे
महागोंड : वेळ दुपारची, आजीबाई अंगणात कपडे वाळत घालत होत्या. घरात दोन वर्षाचा चिमुकला. चिमुकला रांगत रांगत दरवाजाजवळ आला अन् दरवाजाला आतून कडी लागली. दरवाजा बंद झाला. आजी घरात जाण्यासाठी आली असता दरवाज्याला आतून कडी लावल्याने आजीबाई थक्क झाल्या. बाळ अडकल्याने आजीची पाचावर धारण झाली. मात्र, दोन तासाच्या प्रयत्नानंतर या चिमुकल्याची सुखरुप सुटका झाली. अर्णव शिवपुत्र हिडदुग्गी असे या चिमुकल्याचे नाव आहे.उत्तूर येथील लक्ष्मी देवालयाजवळील जुना गारगोटी - उत्तूर येथे राधाकृष्ण पतसंस्थेजवळ हिडदुगी कुंटुंबीय भाडोत्री घरात राहतात. वडील शेताकडे तर आई ही ग्रामसेविका असल्याने ते वझरे येथे गेल्या होत्या. घरात फक्त आजीबाई आणि हा दोन वर्षांचा अर्णव. आजीबाई नातवांचा सांभाळ करत होत्या.दुपारी बाराच्या सुमारास त्या कपडे वाळत घालण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे गेल्या. अर्णव पहिल्या खोलीत खेळत होता. खेळता खेळता उभा राहिला भिंतीचा आधार घेत दरवाजापाशी पोहचला. अचानक कडी लागल्याने दरवाजा आतून बंद झाला. एवढ्यात आजीबाई घरी आल्या तर दरवाजा आतून बंद होता. आजी ओरडू लागली मात्र अर्णवला नीट बोलता येत नसल्याने प्रतिसाद आला नाही. घराला एकच दरवाजा असल्याने अर्णवची सुटका कशी होणार या चिंतेत आजीबाई होत्या.
खिडकी जवळ येवून बोलवू लागल्या. मात्र सुटका कशी होणार या चिंतेत अजीबाई होत्या. बघता बघता आजींनी शेजाऱ्यांना गोळा केले. अर्णव खेळात मग्न होता. त्याच्या शेजारी औषधाच्या बाटल्या होत्या. नकळत औषध प्यायला तर विपरीत घडायला नको म्हणून दरवाजा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अर्णव रांगत रांगत पुन्हा दरवाजाकडे येत होता. त्यामुळे दरवाजा तोडणे अशक्य होते. शेवटी अर्णव रांगेत खिडकीजवळ आला ग्रामस्थांनी त्याला बोलण्यात मग्न केले. तेवढ्यात कटावणीच्या साह्याने दरवाजा तोडून अलगद बाजूला केला. अन् दोन तासानंतर अथक प्रयत्नानंतर अखेर अर्णवची सुटका झाली आणि आजीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला.