बेळगाव : शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला, मराठी फलकांची मोडतोड या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागातील वातावरण कन्नड - मराठी मुद्द्यावरून पुन्हा एकदा तापले असून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगावमध्ये सुरू असलेल्या घटना, कन्नड संघटनांचा धुडगूस आणि यानंतर सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या दोन तरुणांना कर्नाटकपोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या तरुणांनी मराठी भाषिक वाघ आहे, असे स्टेटस ठेवले होते.शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर शुक्रवारी कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या मराठी क्रमांक असलेल्या बोर्डची काळे फासून मोडतोड केली होती. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काही जणांनी फेसबुकवर पोस्ट करून मराठी भाषिक वाघ आहे असे मोबाइलवर स्टेटस ठेवले होते.
यानंतर कर्नाटकपोलिसांनी तरुणांची धरपकड सुरू केली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, अन्य एका घटनेत चार तरुणांना अटक करून सोडून देण्यात आले आहे. मारहाणीच्या या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला आहे.कर्नाटक पोलिसांवर मराठी जनता नाराजसीमा भागातील मराठी भाषिकांवर नेहमीच कर्नाटक सरकार आणि पोलीस अन्याय करतात. या अन्यायाला अनेकवेळा वाचा फोडण्यात आली आहे; परंतु आजतागायत कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर गुलामगिरीची सत्ता लादत आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून मराठी तरुणांवर अशी कारवाई करणाऱ्या पोलीस विभागावर मराठी जनता तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.