आजरा : आजरा-आंबोली महामार्गावर सुळेरानजवळ गव्याच्या हल्ल्यात हत्तीवडे (ता. आजरा) येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. गुढीपाडव्याची सुटी संपून नोकरीसाठी गोवा येथे जात असताना पहाटे पाच वाजता ही घटना घडली. दोघांनाही गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. अजित मारुती कांबळे (वय २६) व सागर धोंडिबा कांबळे (३३) अशी त्यांची नावे आहेत.अजित व सागर गुढीपाडव्याला हत्तीवडे गावी आले होते. सुटी संपवून सोमवारी दोघे आपल्या मोटारसायकलवरून गोवा येथे जात होते. पहाटे पाच वाजता सुळेरान फाटा व जंगल क्षेत्राच्या पुढे मालकी क्षेत्रात गवा रस्त्यावर येत असल्याचे अजितच्या लक्षात आले. त्याने गाडीचा वेग कमी केला. अंधारातून पुढे गेलेला गवा पाठीमागे फिरून त्याने मोटरसायकलवर हल्ला केला. त्यामुळे मोटारसायकलसह दोघेजण दहा फूट फरपटत जाऊन गटरीत पडले. यामध्ये अजित व सागर यांना गंभीर दुखापत झाली.अजित कांबळे हल्ल्यानंतर बेशुद्धावस्थेतच आहे. दोघांवरही गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी, वनपाल बी. आर. निकम यांनी तातडीने घटनास्थळी व दवाखान्यात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला.
Kolhapur: गव्याची दुचाकीला पाठीमागून जोराची धडक, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:51 IST