कोल्हापूर: जोतिबाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या भाविकांमधील लातूरचे दोन तरुण बुडाले. हा प्रकार लक्षात येताच जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी पंचगंगा विहार मंडळाच्या मदतीने नदीत उडी घेऊन दोन्ही तरुणांना बाहेर काढले. वेळीच मदत मिळाल्यामुळे बुडणारे दोघे बचावले. हा प्रकार रविवारी (दि. १४) सकाळी घडला.
लातूर जिल्ह्यातील तांबरवाडी (ता. निलंगा) येथील महादेव खामकर हे कुटुंबीयांना घेऊन रविवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचले. जोतिबा डोंगर येथे दर्शनासाठी जाण्यापूर्वी ते सर्वजण पंचगंगा नदी घाटावर आंघोळीसाठी थांबले. उत्साहाच्या भरात त्यांचा मुलगा प्रेम खामकर (वय १६) आणि भाचा धीरज सावरे (वय २३) हे दोघे नदी पात्रात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. हा प्रकार लक्षात येताच पंचगंगा घाटावर फिरण्यासाठी आलेले जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी पाण्यात उडी घेतली. प्रेम याला बाहेर काढताना त्याने हात ओढल्याने दोघेही काही काळ गटांगळ्या खात होते. त्याचवेळी पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांनी प्रेम आणि धीरज या दोघांना पाण्यातून बाहेर काढले.
डोळ्यादेखत मुले बुडत असल्याचे पाहून खामकर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. मात्र, जीवरक्षक निंबाळकर यांच्यासह पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य उदय कदम, प्रशांत कदम, अमर कदम, विनायक पाटील, आदींच्या प्रयत्नांमुळे दोन्ही तरुणांना जीवदान मिळाले. सीपीआरमध्ये उपचार घेऊन खामकर कुटुंबीय देवदर्शनासाठी गेले.
नशिब बलवत्तर
दोन्ही तरुण पाण्यात पूर्ण बुडाले होते. कोणत्याही साधनाशिवाय त्यांना बाहेर काढणे कठीण काम होते. मात्र, जीवरक्षक निंबाळकर यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून दोघांना सुखरूप बाहेर काढले. नशिब बलवत्तर म्हणूनच दोघांचे प्राण वाचले, अशी चर्चा पंचगंगा घाटावर सुरू होती. खामकर कुटुंबीयांनी पंचगंगा विहार मंडळाचे आभार मानले.