शिरोळ : जुलैमध्ये आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात जवळपास सोळा हजार हेक्टर ऊस पिकाला फटका बसला आहे. यामध्ये पंधरा टक्के ऊस मोठ्याप्रमाणात बाधित झाल्यामुळे त्याचे जळण झाले आहे. त्यामुळे शेतकरी असा ऊस पेटवून देत आहेत. तर गळीत हंगाम वेळेत सुरू होऊन आपला ऊस लवकर तुटून जावा, अशी मानसिकता शेतकऱ्यांची आहे.
कृष्णेसह, पंचगंगा, वारणा व दुधगंगा नद्यांना महापूर आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना फटका बसला आहे. यामध्ये शेतीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक दिवस ऊस पिकात पाणी साचून राहिल्याने नदीकाठावरील पिकांचे अक्षरश: जळण झाले. शेती विभागाकडून पंचनामे जवळपास पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे जळण झालेला ऊस शेतकरी पेटवू लागले आहेत. तर पंचनामे न झालेला बाधित ऊस भकास दिसू लागला आहे. प्रत्येकवर्षी महापूर येणार असेल, तर शेती पिकवायची की नाही, अशी शेतकऱ्यांची मानसिकता असली तरी शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना शेतजमीन स्वच्छ करून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयारी करावी लागत आहे. बियाणे, खतांचा खर्च वाया गेला असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
फोटो - २४०८२०२१-जेएवाय-०६, ०७ फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरील ऊस पिकाचे जळण झाल्यामुळे शेतकरी ते पेटवून देत आहेत. (छाया- सुभाष गुरव, शिरोळ)