रमेश सुतार : बुबनाळ : फेसबुकवर मित्रांना मेसेज करत पैशाची मागणी केल्याचा प्रकार सर्वत्र घडत आहेत. मात्र, मित्राला पैशाची गरज असती तर तो फोन न करता फेसबुकवर अनोळखी नंबरवर गुगल पे करण्याची विनंती का करतो, असा प्रश्न पडत आहे. मात्र, याचा उलगडा थोड्या दिवसांनी झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असाच काहीसा प्रकार शिरोळ तालुक्यात पहावयास मिळत आहे.
कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक घडी कोलमडली. त्यातच फसवणुकीचे नवनवे प्रकार वाढत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मित्र परिवारांचा संपर्क अनेकांचा आहे. मात्र, याचाही वापर फसवणुकीसाठी होत आहे. शिरोळ तालुक्यात राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर अशा मोठ्या व्यक्तींच्या सोशल मीडियावरील प्रोफाईल अज्ञातांकडून हॅक करण्यात येत आहेत. प्रोफाईल हॅक केल्यानंतर सायबर हल्लेखोरांकडून संबंधित व्यक्तींच्या मित्रांकडे पैशाची मागणी करण्याचा मेसेज केला जात आहे आणि ही मागणी करीत असताना अनोळखी नंबरवर ‘गुगल पे’वरून पैसे पाठविण्याचा घाट घातला जात आहे.
आपल्या मित्राला पैशाची गरज आहे, म्हणून तातडीने संबंधितांकडून पैसे पाठविले जातात. मात्र, प्रत्यक्षात मित्राला भेटल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. नृसिंहवाडीतील एका डॉक्टर तसेच तालुक्यातील अनेकांची फेसबुक प्रोफाईल हॅक करून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. मात्र, या मेसेजची चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे फेसबुकवरून कोणी पैशाची मागणी करीत असेल तर संबंधित व्यक्तीला फोन करून अथवा प्रत्यक्षात भेटून खात्री करावी. प्रोफाईल हॅक झाल्यास बंद करावे; अन्यथा मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.
--------
कोट - फेसबुकवरील माझे प्रोफाईल हॅक करून काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली होती. मात्र, संबंधित मित्राने मला फोन केल्यावर प्रोफाईल हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तरी फेसबुकवरून कोणी पैशाची मागणी करीत असेल तर त्या व्यक्तीची चौकशी करावी.
- डॉ. किरण पवार