कोल्हापूर : कसबा बावडा येथील तलाठी महेश सूर्यवंशी यांनी काही मिळकतींची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या तक्रारी थेट गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे काल, सोमवारी करण्यात आल्या. मंत्री पाटील यांनी करवीर तहसीलदार व प्रांत प्रशांत पाटील यांना सूर्यवंशी यांची तत्काळ बदली करा, चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र मंत्र्यांनी आदेश देऊनही सूर्यवंशी यांच्याबाबत प्रांत कार्यालय नरमाईची भूमिका घेत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.कसबा बावड्यातील तलाठी महेश सूर्यवंशी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. शेतात टाकण्यासाठी मातीच्या रॉयल्टीच्या मुद्दयावरून सहा महिन्यांपूर्वी श्रीराम सोसायटीच्या संचालकांनी सूर्यवंशी यांची खरडपट्टी केली होती. त्यांच्या अनेक तक्रारी यापूर्वीच गृहराज्यमंत्र्यांच्या कानावर गेल्या होत्या, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी सक्त ताकीद यापूर्वीच सूर्यवंशी यांना दिली होती. मात्र, यानंतरही सूर्यवंशी यांच्या कारभारात फरक पडला नाही.कसबा बावड्यातील काही नवशिक्या वकिलांना हताशी धरून दुबार नोंदणी झालेल्या मिळकती शोधून मूळ मिळकतधारकांच्या माघारी परस्पर विक्री करण्याचा पराक्रम तलाठी कार्यालयाने केला. दुबार नोंदणी असा कच्चा लिहिलेला उल्लेख खोडल्याचे अनेक दप्तरात दिसून येतो. अशा तब्बल ३५हून तक्रारदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची विनंती केली होती. गुरुवारी (दि. २४) कसबा बावड्यातील परस्पर मिळकती दुसऱ्याच्या नावावर केलेल्या प्रकरणावर लेखी व तोंडी म्हणणे सादर करण्याचे आदेश करवीर तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिले आहेत. मंडल अधिकारी एन. बी. जाधव यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी केली असून, गोपनीय अहवालात अत्यंत गंभीर शेरे मारले असल्याचे समजते.आजोबांच्या नावाची वारसा हक्काने येणारी आजच्या बाजारभावाने तब्बल ९० लाखांच्या जमिनीवरील हक्क तलाठ्यांनी डावलला. याबाबत लेखी तक्रारी केल्या आहेत. लवकरच फौजदारी गुन्हाही दाखल करणार आहे. - सतीश वेटाळे, तक्रारदारकसबा बावड्याप्रमाणे जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणीही अशी प्रकरणे झाली असल्यास तक्रारदारांनी पुढे यावे. कसबा बावडा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आणखी तक्रारी आल्यास विभागीय चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. मिळकत- धारकांनीही फौजदारी गुन्हे दाखल करावेत. - जिल्हाधिकारी राजाराम माने
कसबा बावड्यात परस्पर जमीन विक्रीचे प्रकार
By admin | Published: July 23, 2014 12:15 AM