भारत चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूरचाफुटबॉल खेळ बहरला पाहिजे, देशपातळीवर कोल्हापूरचे नाव झाले पाहिजे, येथील खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, खेळाडूंचे याच खेळात करिअर घडले पाहिजे, अशी सगळ्यांचीच भावना आहे; पण वारंवार मैदानावर प्रेक्षकांत होणारी हुल्लडबाजी, खेळाडू, समर्थकांत होणारी हाणामारी, मैदानावरील चप्पल, बाटल्याची फेकाफेकीचे प्रकार पाहता तमाम शौकिनांच्या भावनांना छेद देण्याचे प्रकार घडत आहेत, म्हणून फुटबॉल खेळच बंद करूया का, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.एकदा दोनदा नव्हे अनेक वेळा फुटबॉलच्या मैदानावर होणारी हुल्लडबाजी, पेठा पेठातील अनावश्यक ईर्षा, फालतून अभिमान, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चांगल्या खेळाच्रूा कौतुकाऐवजी त्याचा द्वेश करण्यावृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.पोलिस प्रशासनाने दखल घेऊन समजावण्याचा, एकोपा ठेवण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांनी प्रतिस्पर्धी संघ व समर्थकांत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या विकासासाठी, खेळाडूंच्या करिअरसाठी एवढे सगळे प्रयत्न होऊनही जर ‘पालथ्या घागरीवर पाणी’ पडणार असेल तर मग फुटबॉल स्पर्धा तरी का आणि कशासाठी भरवायच्या, असा उद्विग्न सवाल शौकिनातून विचारला जात आहे.मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार झाला आहे. मान्यवरांच्या प्रयत्नामुळे वादावर पडदा टाकायचा, त्यानंतर शंभर दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात सामने घ्यायचे. थोडेच दिवस सामने सुरळीत झाले की मग पुन्हा वाद, ईर्षा, दगडफेक, हुल्लडबाजी असा अनुभव येत आहे. खेळाडू आचारसंहिता पाळणार नाहीत, समर्थक निरर्थक अभिमान सोडून देणार नसतील तर मग सामने भरविणे बंद करावेत किंवा याबाबतीत संबंधितांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी. अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत, उलट पेठापेठात द्वेष वाढतच राहणार आहे.
काय करायला पाहिजे?
- सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न करून कोणी ऐकत नसेल तर कडक धोरण स्वीकारणे अपरिहार्य.
- खेळाडू आचारसंहिता पाळणार नसतील तर त्यांच्यावर ठोस कारवाई करायला पाहिजे.
- खेळाडूंनी हाणामारीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले तर त्या खेळाडूवर बंदी घातली पाहिजे.
- संघ, खेळाडूंवर कारवाई करताना संबंधित पंच, केएसए यांनी दुजाभाव करता कामा नये.
- मैदानाच्या बाहेर उमटणाऱ्या घटनांची नोंद घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी.
- केएसए, पंच यांची भूमिका नि:संशय ठेवण्याचा प्रयत्न व्हावा.