कोल्हापूर : वर्ग चारची पदे निरसित करू नये, याबाबतचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा, कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण करू नये, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे सरळ सेवेने भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे लाक्षणिक संप करण्यात आला.
हा संप शंभर टक्के यशस्वी करीत जिल्ह्यातील अडीच हजारांवर कर्मचारी यात सहभागी झाले, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती.संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत २७ ते २९ जानेवारी दरम्यान राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम केले. गुरुवारी दुपारी एक ते दोन या जेवणाच्या सुट्टीत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अखेरच्या दिवशी लाक्षणिक संप करण्यात आला. यात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, ट्रेझरी, आयटीआय, पशुसंवर्धन, सिटी सर्व्हे, यासह ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांमधील अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे या कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागला.