आजरा : उचंगी प्रकल्पाच्या धरणग्रस्तांना चित्रानगर धरणग्रस्त वसाहतीमधील भूखंड वाटपाचा आदेश झाला आहे; पण गेली आठ वर्षे या भूखंडाचा ताबा मिळालेला नाही. भूखंडाचा ताबा महिनाअखेरीस न मिळाल्यास अनुसया बाबू घेवडे या आपल्या कुटुंबीयांसह १ जानेवारी २०२१ पासून आजरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे. उचंगी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात अनुसया घेवडे यांचे गट नंबर १३२, १८२ व ११० व सध्या राहत असलेले घरही गेले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार पर्यायी जमिनी बुरुडे, मुरुडे, मेंढोली येथे मिळाली आहे.
गेली दहा वर्षे १२ ते १३ कि. मी. अंतरावरील शेती करावी लागत आहे. आमच्या कुटुंबात २२ माणसे असून, जमिनीलगत असणाऱ्या चित्रानगर धरणग्रस्त वसाहतीमधील प्लॉट नं. ७४ मिळावा म्हणून मागणी केली आहे; परंतु भूखंडाचा अद्यापही ताबा मिळालेला नाही. या भूखंडाबाबत तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयातर्फे प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. सध्या उचंगी धरणाचे काम सुरू होणार आहे. पाठोपाठ पाणीही साठविले जाणार असून, आमच्या कुटुंबाचा राहण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे चित्रानगर धरणग्रस्त वसाहतीमधील भूखंडाचा ताबा मिळावा, अन्यथा १ जानेवारीपासून आजरा तहसील कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आमरण उपोषण करीत असल्याचे निवेदन अनुसया घेवडे यांनी दिले आहे.