मोहन सातपुतेउचगाव: उचगाव (ता.करवीर) येथील ग्रामस्थांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत आज, सोमवारी गाव बंदची हाक देत सर्व व्यवहार बंद ठेवले. आमच्या गावात आमचंच सरकार, हद्दवाढीस उचगाव ग्रामस्थांचा तीव्र इन्कार, असे म्हणत गाव बंद ठेवले.उचगाव येथील हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने आज उचगाव बंद करण्याची हाक देण्यात आली होती. या अनुषंगाने उचगाव हद्द वाढविरोधी कृती समितीने ग्रामपंचायत कमानी जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ एकत्र येत गाव बंद ठेवून एकजुटीने हद्दवाढीला विरोध दर्शविला.यावेळी कृती समिती सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर महानगरपालिका आपल्या नागरिकांना सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. हद्दीतील गावांचा समावेश करून कर वसूल करण्याचे मनसूबे रचत आहे. परंतु हद्दवाडीमध्ये उचगावला समाविष्ट करू नये. उचगाव कधीही हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणार नाही असा निश्चय करत हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी गाव बंद करुन हद्दवाढ विरोधात एल्गार पुकारला. नागरिकाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गांधीनगर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समिती अभिजीत पाटील, विक्रम चौगुले, अजित पाटील, शरद चव्हाण, गोगा पाटील, अभिजीत कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर महापालिकेने पहिला उपनगरांचा विकास करावा. त्यांना पहिल्या सुखसोयी द्याव्यात. गावाचा विकास करायला महानगरपालिकेचा कर ग्रामीण जनतेला न सोसनारा आहे. शेती व्यवसाय त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असणारा दुग्धव्यवसाय हद्दवाढीमुळे धोक्यात येवू शकतो. - अभिजीत पाटील, मनसे, करवीर तालुका अध्यक्ष