कोल्हापूर : महसूल विभागात अधिकारपदी कार्यरत आणि मूळचे कोल्हापूरचे असणाऱ्या उदय आनंदराव जाधव-कसबेकर आणि किशोर सदाशिव तावडे यांचा भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या संवर्गामध्ये समावेश झाला आहे.गुणवत्ता, सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पदोन्नती दिली आहे. त्यांना महसूल विभागातील कोट्यातून संधी मिळाली आहे. त्यांच्या पदोन्नतीची अधिसूचना भारत कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती मंत्रालयाने काढली आहे.
कोल्हापूरचे असणारे उदय जाधव-कसबेकर हे सध्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवपदी आहेत. सन १९८७ मध्ये ते महसूल विभागात तहसिलदारपदी रुजू झाले. त्यांनी कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
अर्बन लँड सिलिंग, वैधानिक महामंडळ, एमआयडीसी, एमएसआरडीसी, जीवन प्राधिकरण या विभागांमध्येही काम केले आहे. दरम्यान, किशोर तावडे हे मूळचे पिवळावाडा (शुक्रवार पेठ) येथील आहेत. ते सध्या मुंबईतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत.
ते सन १९९५ मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारीपदी रुजू झाले. त्यानंतर त्यांनी सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी, एमआयडीसी कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी, आदी पदांवर काम केले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण हे कोल्हापूरमध्ये झाले आहे.