कोल्हापूर : मी शिवसेनेकडून राज्यसभेचा खासदार झालो तर ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा प्रचार करेन असा ड्राफ्ट उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याकडून लिहून घेतला होता असा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ठाकरे यांनीच कोल्हापूरच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. ते काल, बुधवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.सामंत म्हणाले, एखादे तरी छत्रपती घराण्यातील कोणीतरी आपल्यासोबत असावे अशी भूमिका ठाकरे गटाची होती. यातूनच संभाजीराजे यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्याकडून ड्राफ्टही लिहून घेण्यात आला. मात्र त्यांच्याऐवजी संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आणि गादीचा अपमान करण्यात आला. संभाजीराजे हे पुरस्कृत उमेदवार असले तरी सभागृहात पक्षाचे काम करतील. त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली पाहिजे. पक्षप्रमुख हे आमचे नेते आहेत हे त्यांनी मान्य केले पाहिजे असेही ड्राफ्टमध्ये नमूद करण्यात आले होते. संभाजीराजे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. त्यांच्याकडून असा ड्राफ्ट लिहून घेवू नये अशीही मी विनंती केली होती. तेव्हा आपण जर उमेदवारी देणार आहोत तर त्यांच्याकडून लिहून घ्यायला काय हरकत आहे असेही मला सांगण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
By समीर देशपांडे | Published: May 02, 2024 3:20 PM