संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले २२ हजार लोकसंख्येचे उदगाव हे गाव आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सांगली जिल्हा असून, उदगाव, जयसिंगपूर परिसरातील गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यात अगदी एक किलोमीटरमध्ये आश्रय मिळतो. त्यामुळे उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. उदगाव येथे झालेल्या जबरी दरोड्यामुळे गाव भीतीच्या छायेखाली असून, दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे उदगावमध्ये पोलीस आऊटपोस्ट गरजेचे आहे.कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया उदगावमध्ये औद्योगिक वसाहती, सांगली-कोल्हापूर महामार्ग, रेल्वे लोहमार्ग असून, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील आंदोलने, अपघाताचे क्षेत्र, जोगणी यात्रा येथे सातत्याने होत असतात. यामुळे जयसिंगपूर पोलिसांना वारंवार उदगावमध्ये बंदोबस्त ठेवावा लागतो. अशातच रविवारी मध्यरात्री निवृत्त प्रा. बाबूराव निकम यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालून त्यांची पत्नी अरुणा निकम यांना ठार करून २५ तोळे सोने व ५० हजारांची रोकड लंपास केली होती. या घटनेमुळे उदगाव परिसर भीतीच्या छायेखाली आहे.उदगाव-जयसिंगपूर परिसरात एखादी घटना घडली तर तो गुन्हेगार सांगली जिल्ह्याच्या आश्रयाला जातो. त्यामुळे कोल्हापूर व सांगली पोलिसांना शोधमोहिमेसाठी अडचणीचे ठरते. फक्त एक किलोमीटरवर असलेल्या सांगली जिल्ह्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळत आहे. यातच उदगावमध्ये वाळू, वीट, माती व्यवसायासह बेकायदा सावकारकी जोमात आहे. अवैध धंद्याचे कनेक्शन उदगावकरांना डोकेदुखी बनले आहे. अशातच येथे गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या बाबींचा आढावा घेऊन तत्काळ उदगावला पोलीस आऊटपोस्ट मंजूर करावे, अशी मागणी गावातून जोर धरत आहे.कुटुंब धास्तावलेनिकम कुटुंबीय हे सर्वसामान्य जनतेत मिसळून वागणारे आहे. हुपरी येथून बाबूराव निकम हे दोन वर्षांपासून निवृत्त झाल्यापासून ज्येष्ठ सेवासंघ व शेतीमध्ये लक्ष घालून त्यांचा दिनक्रम सुरू होता. अशातच दरोडेखोरांनी रेकी करून निकम यांच्या घरी दरोडा टाकला. यामध्ये अरुणा निकम या जागीच ठार झाल्या, तर बाबूराव निकम यांच्यावर मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची दोन मुले व मुलगीला जबरी धक्का बसला असून, निकम कुटुंबीय धास्तावले आहेत.
उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:00 AM