राजाराम लोंढेकोल्हापूर : मुंबईसह व ठाणे, कल्याण मतदारसंघात शिंदेसेना व उद्धवसेनेची प्रतिष्ठा पणास लागल्याने तिथे जोडण्या लावण्यासाठी पक्षातील विश्वासू शिलेदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे तर शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेली पाच दिवस तळ ठाेकला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर मतदारसंघातील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. लोकसभेच्या निकालावरच आगामी मुंबई महापालिकेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. उमेदवार निश्चितीपासून डाव-प्रतिडावाचे राजकारण रंगले आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर स्थानिक नेत्यांचे विभाजन झाले, पण मतदारांचे काय? याचा अंदाज दोन्ही नेत्यांना नसल्याने कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास तयार नाहीत.महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील निष्ठावंत व जोडण्या यशस्वी करणारे नेत्यांना मुंबईत बोलावले आहे. उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार हे सध्या दक्षिण मध्य मुंबई व दक्षिण मुंबई या दोन मतदारसंघात प्रचारात सक्रिय आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार धैर्यशील माने यांच्यावर दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, ठाण्यासह इतर दोन मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे.
उतराईसाठी..‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्यात सर्वाधिक काळ तळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात ठोकला होता. येथे बसून त्यांनी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यासाठी जोडण्या लावल्या होत्या. त्यामुळे धैर्यशील माने व राजेश क्षीरसागर यांनी मुंबईत तळ ठोकला.दादांच्याही जोडण्या..भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मुंबईत गेलेले दिसत नाहीत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र तिथे प्रचारात सक्रिय आहेत.
कोणत्याही निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने बोलावण्याची वाट कशाला बघायची? ती तर आपली जबाबदारी असते. हे आम्ही शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो. - संजय पवार (उपनेते, उद्धवसेना)