लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे : सरकार भोंगळ कारभार करीत आहे. कोकणातील शेतकऱ्यांना भाताला हमीभाव नाही. मंत्र्यांचे लिपिक भ्रष्टाचार करीत आहेत. परराज्यातील मत्स्य व्यावसायिकांचा कोकणातील शिरकाव डोकेदुखी ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कर्जमाफीची मागणी करणारे उद्धव ठाकरे हेही राज्य सरकारमधील हिस्सेदार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना तेही तेवढेच जबाबदार आहेत, असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या संघर्ष यात्रेची जाहीर सभा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे झाली. त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) यांच्यावतीने चांद्यापासून बांद्यापर्यंत निघालेली यात्रा बुधवारी दुपारी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोहोचली. यावेळी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्यात आली. गोविंदरावजी निकम विद्यालयातील भाऊसाहेब महाडिक सभागृहात हजारो शेतकरी आणि कष्टकरी उपस्थित होते.प्रास्ताविकमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील प्रश्न राज्यातील नेतेमंडळींच्या समोर मांडले. ३० हजार पाचशे कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. बाकी उधळपट्टीसाठी सरकारकडे पैसे आहेत. राज्य सरकार हे शिव्या आणि शाप देणारे सरकार असल्याची टीका प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. सात-बारा कोरा करतो म्हणून सांगत मोदींनी देशाला, तर फडणवीसांनी राज्याला देशोधडीला लावले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.सहावेळा खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्यांनी कोकणासाठी काय केले, असा प्रश्न राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. महामार्गावर दरवर्षी अपघातात चारशे बळी जातात, याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी केला. नारायण राणे म्हणाले...- विधान परिषद सुरू राहावी आणि वैयक्तिक कारणासाठी सुरुवातीला संघर्ष यात्रेत सहभागी झालो नव्हतो.- सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. उलट चेष्टा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाते.- सत्तेसाठी हापापलेली शिवसेना डरपोक आहे.- रामदास कदम यांनी कॉलेजची जमीन बळकावली.- ६२ पैकी ३७ आमदार कुठे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी शोधावे- कोकणाने वेगळा कोकण कधीच मागितला नाही- अच्छे दिन ऐवजी महागाई वाढली- नोटबंदीमुळे बाजारपेठेतील ४० टक्के व्यवहार ठप्प- मासेमारी ठप्प आहे, कोकणातल्या माणसांची चेष्टा सुरू आहे.- वाळूवर, चिऱ्यावर रॉयल्टी वाढवली, पण शिवसेनेचे चार-चार मंत्री असून काहीच उपयोग नाही, लोणचं घाला या मंत्र्याचं.- सरकारचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे.धनंजय मुंडे म्हणाले...- रामदास कदम आणि सेनेला गंभीर घेऊ नका- सेनेनं आता वाघ काढून सरडा चिन्ह लावलं पाहिजे- कॅबिनेटमध्ये निर्णय होताना रामदास कदम झोपले होते का?- निर्णय झाल्यावर तमाशा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, हे थांबलं पाहिजे, नाहीतर सेनेचा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही.
आत्महत्यांना उद्धव ठाकरेही जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 11:07 PM