Kolhapur: 'उत्तर' विधानसभा आमचे नाक, लढवणार; शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेसला ठणकावले, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:03 PM2024-09-24T18:03:24+5:302024-09-24T18:04:12+5:30
संजय पवार इच्छुक, पण..
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आठ वेळा लढवला आहे. या मतदारसंघात आमची ताकद असतानाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचा मान राखण्यासाठी शिवसेनेने तो मतदारसंघ काँग्रेसला खुल्या दिलाने दिला. उत्तर विधानसभा मतदारसंघ तर आमचे नाक आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात जास्त लक्ष घालू नये, तो मतदारसंघ आम्हीच लढवणार या शब्दांत शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेसला ठणकावले. संजय पवार, रविकिरण इंगवले, प्रज्ञा उत्तुरे यांनी आपण लढण्यास तयार असल्याचे जाहीर करून टाकले.
शाहू स्मारकच्या मिनी सभागृहात उद्धवसेनेच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच्या पालख्या वाहून खांदा दुखायला लागला, आता पक्षाचाच कार्यकर्ता पालखीत बसवूया असे सांगत उत्तर विधानसभा मतदारसंघावर ठामपणे दावा सांगितला. शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, प्रज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे उपस्थित हाेते.
संजय पवार म्हणाले, लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसैनिकांनी काँग्रेसचे शाहू छत्रपती यांच्यासाठी जीवाचे रान केले. उत्तर विधानसभा मतदारसंघ तर आमचाच आहे. ही जागा पाचवेळा आम्ही जिंकली आहे. त्यामुळे काँग्रेसने मोठ्या मनाने या जागेवरचा दावा सोडून ती शिवसेनेला द्यावी.
विजय देवणे म्हणाले, मोठ्या मनाने आम्ही तुम्हाला लोकसभेची जागा दिली. त्यामुळे काँग्रेसनेही त्याच मनाने आमचा उत्तर विधानसभा मतदारसंघ आम्हाला द्यावा. उत्तरमध्ये ज्यांनी गद्दारी केली. त्यांना गाडण्यासाठी त्याच मातीतला पैलवान हवा. त्यामुळे उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनाच लढवेल. रविकिरण इंगवले म्हणाले, पालखी उचलून उचलून खांदा दुखायला लागला. त्यामुळे आता आपलाच कार्यकर्ता त्या पालखीत बसवूया. यावेळी उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा ठराव करण्यात आला.
मी इच्छुक; पण पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम मानणार
या मेळाव्यात संजय पवार यांनी उत्तरमधून लढण्यास मी इच्छुक असल्याचे जाहीर केले. गेल्या साडेतीन दशकांपासून काम करतोय. अनेकवेळा संधी जवळून गेली. त्यामुळे आता संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याचा नेटाने प्रचार करणार असल्याचेही पवार म्हणाले. अवधूत साळोखे म्हणाले, करवीर, उत्तर आणि आणि दक्षिण हे मतदारसंघ दुसऱ्या पक्षांना गेले तर आम्ही काय करायचे. उत्तरसाठी दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा बळी नको. तेथील कार्यकर्त्यांनाही ताकद द्यायला हवी.
परस्पर कार्यक्रम ठरवू नका
रविकिरण इंगवले यांनी या मेळाव्याच्या कार्यक्रमाची कल्पना दिली नसल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर संजय पवार यांनी ही कुरबुरीची वेळ नाही. मात्र, तुम्हीही परस्पर कार्यक्रम ठरवू नका, त्याची माहिती पक्षालाही द्या, असा टोला लगावला.