कोल्हापूर : लोकसभेसाठी कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरूण नरके, संदीप नरके यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. लोकसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे आठ दिवसात निर्णय घेतली अशी माहिती अरुण नरके यांनी दिली.‘मातोश्री’वरील या बैठकीसाठी नरके यांना शनिवारी निरोप आला होता. त्यानुसार हे तिघेही सकाळीच मुंबईला रवाना झाले होते. या बैठकीला खासदार संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई, अजित देसाई हे देखील उपस्थित होते. लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार याची मोठी उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यात होती. नरके यांनी वर्षभरापूर्वीच आपली इच्छा जाहीर करून त्यांनी मतदारसंघाचा एक दौराही काही दिवसांपूर्वी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर याआधीही चेतन नरके यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. ‘मातोश्री’वर नरके कुटुंबीय आणि ठाकरे यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी एकूणच जिल्ह्याचे राजकारण, सध्याची स्थिती याची चर्चा झाल्याचे समजते.चेतन नरके हे शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत ज्या जागा लढवल्या होत्या, त्या मतदार संघातील उमेदवारांची निश्चिती आठवड्यात करून त्यांना काम सुरू करण्यास सांगण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.शिवसेना पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठकयेत्या आठवड्याभरात ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ‘माताेश्री’वर होणार असून यावेळी नरके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील शिंत्रे, विजय देवणे यांना बोलावण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांना नरके पिता-पुत्र भेटले, चेतन नरके लोकसभेसाठी शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 2:04 PM