Uddhav Thackeray Kolhapur ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापुरात भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांना शाहू महाराज हे कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि त्यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिक पूर्ण ताकद झोकून देतील, असं म्हटलं आहे.
शाहू महाराजांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी आज शाहू महाराजांचा भेट घेतली आहे. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. मला आनंद आहे की, ते ऋणानुबंध या पिढीतही आणि पुढील पिढीतही कायम राहतील. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीतून निश्चित झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी प्रचाराला तर येणारच आहे, पण विजयी सभेलाही येणार आहे, असं वचन मी महाराजांना दिलं आहे," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
दरम्यान, "आम्ही जी लढाई लढतोय त्यामध्ये विजयी होण्यासाठी मी महाराजांचे आशीर्वादही घेतले आहेत. शिवसेनाप्रमुख असताना १९९७-९८ साली आलो होतो, त्यानंतर आज मी महाराजांकडे आलो आहे, यापुढेही येत राहील. बाकी इतर गोष्टींवर मी प्रचारसभेत बोलेन," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोल्हापुरात काय आहे स्थिती?
महाविकास आघाडीत काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यात तीन आमदार आहेत. शिवाय दोन विधानपरिषदेचे आमदार या पक्षाकडे आहेत. सर्व तालुक्यांत संघटना बांधणीही चांगली झाल्याने काँग्रेसने ही जागा आपल्याला मिळावी असा दावा केला होता. काँग्रेसने १९९९ ला या जागेवर शेवटची निवडणूक लढवली आहे. तेव्हापासून ती राष्ट्रवादीकडे गेली. २००९ आणि २०१९ च्या लढतीत राष्ट्रवादीचाही पराभव झाला. आता राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर त्यांच्याकडे एकही आमदार नाही. लोकसभेला लढत द्यावी असे मजबूत संघटन नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली असून काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.