कोल्हापूर : हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत जी भूमिका मांडली होती तीच आम्ही पुढे नेत आहोत. परंतू सत्तेसाठी हिंदूत्व बासनात गुंडाळून ठेवलेल्या उद्धव ठाकरे यांनी याबाबतची आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दरेकर बोलत होते. यावेळी माजी आमदार माधव भंडारी, प्रवक्त केशव उपाध्ये उपस्थित होते.दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने जे प्रकल्प आखले ते देखील या सरकारला पूर्ण करता आलेले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरसाठी मोठा निधी आणला. कोविड काळात इतर राज्य सरकारांनी विविध पॅकेजीस दिली मात्र महाराष्ट्रात यातील काहीही झाले नाही.एकीकडे संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो. परंतू नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय अडचण आहे हेच कळत नाही. कोल्हापूरमधील तीर्थक्षेत्र आराखडा, थेट पाईपलाईनची कामे झाली नाहीत. संजय पवार हे महिलांच्या सन्मानाचा विचार मांडत आहेत. परंतू पुणे आणि औरंगाबाद येथे महिलांच्या बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडल्या. परंतू तेथे उध्दव ठाकरे यांनी कारवाई केली नाही हे देखील लक्षात घ्या.
शिवसैनिकांच्या खांद्यावर काँग्रेसचा झेंडाकेवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घ्यावा लागला. तर आता कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा झेंडा घ्यावा लागला याचे दुख आहे.