संतोष मिठारी ।कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव गेल्या चार वर्षांत एकदा नव्हे, तर दोन वेळा मंत्रिमंडळात झाला. मात्र, प्रत्यक्षात विकासासाठी पूरक ठरणारी विमानसेवा सुरू झालेली नाही. नामकरण झाले, त्याच्या श्रेयवादावरही उड्या पडल्या परंतू जे मुख्य आहे ते विमान मात्र अजूनही धावपट्टीवर यायला तयार नाही.
विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कोल्हापुरातील राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी, छत्रपती राजाराम महाराजप्रेमी आणि कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनकडून वारंवार केली जात होती. यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जून २०१४ मध्ये विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला; पण, प्रत्यक्षात नामकरणाबाबत शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडे हा ठरावच गेला नाही.
यानंतर भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या संघटनांनी नामकरणाची मागणी केली. त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक यांनी नामकरणाबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. पालकमंत्री पाटील यांनी नामकरणाबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ जानेवारी २०१८ ला मंजुरी दिली. नामकरण झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी विमानसेवादेखील लवकरच सुरू होईल, अशी आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात या दृष्टीने अपेक्षित गतीने कार्यवाही होत नसल्याने संबंधित आश्वासनेदेखील हवेतच राहिली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा लवकरच सुरू होण्याची आशा पल्लवित झाली होती; पण, त्यावरदेखील पाणी फिरले आहे. विमानसेवा सुरू नसल्याने जिल्ह्याच्या उद्योग-व्यवसायांच्या विकासातील मोठा अडथळा ठरत आहे.तोपर्यंत हवेतच इमले..विमानतळाच्या नामकरणाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने आगामी अधिवेशनात हा प्रस्ताव दोन्ही सभागृहांमध्ये ठरावाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा ठराव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने मंजुरी दिल्यावरच त्याचे नामकरण होईल, तोपर्यंत तरी सगळे हवेतीलच इमले आहेत.सगळेच ठप्प...कोल्हापूरची विमानसेवा आठवड्यातील मंगळवारी, बुधवारी आणि रविवारी पुरविली जाणार असून, तिचा प्रारंभ दि. २४ डिसेंबरपासून होईल, असे खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिसेंबर २०१७ च्या दुसºया आठवड्यात जाहीर केले.यातच कोल्हापूर-मुंबई ही सेवा सहा दिवसांसाठी असावी, असा आग्रह ‘एअर डेक्कन’ने धरला. सहा दिवसांच्या सेवेसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी जीव्हीके कंपनीकडे केली.‘एअर डेक्कन’ आपल्या आग्रहावर ठाम असल्याने आणि जीव्हीके कंपनीकडून मागणी मान्य झाली नसल्याने, या मागणीबाबत दिल्ली येथील केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयात १९ डिसेंबरला झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. आता ही सेवा पुढे कधी सुरु होणार याबाबत कुणाकडेच ठोस उत्तर नाही.
उड्डाण योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविण्यासाठी मान्यता मिळालेल्या ‘एअर डेक्कन’कडून अजून सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे सेवा पुरविण्यासाठी विमान कंपनी बदलून द्यावी, यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव चोबे यांची भेट घेणार आहे.- खासदार धनंजय महाडिक