जयसिंगपूर : डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेने येणाऱ्या तीन वर्षांमध्ये बँकेचा मिश्र व्यवसाय एक हजार कोटी वाढविण्याचा मानस केला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना व महापूर आपत्तीमध्ये बँकेने व्यवसायामध्ये भरीव वाढ केली आहे. सभासदांना दहा टक्के लाभांश दिला जाईल. बँकेचा विस्तार वेगाने वाढविण्याकरिता बँक लवकरच मल्टिस्टेटमध्ये पदार्पण करीत आहे, असे प्रतिपादन श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
येथील डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने श्री दत्त साखर कारखान्याच्या सभागृहात पार पडली. प्रारंभी स्वागत करून बँकेचे अध्यक्ष महादेव राजमाने म्हणाले, चौदा शाखाद्वारे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये बँकेचा विस्तार आहे. यावर्षी ४८९ कोटींचा व्यावसायिक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. ३४५ कोटी ठेवी असून, १४४ कोटी कर्जे वितरित केली असल्याचे त्यांनी सांगितले. नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कदम यांनी केले. यावेळी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष महेंद्र बागे, जनार्दन बोटे, मिलिंद जगदाळे, आण्णासाहेब पाटील, दामोदर सुतार यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २४०९२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथे डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेच्या वार्षिक सभेत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.