संतोष मिठारीकोल्हापूर : राज्यातील १० विद्यापीठे आणि एका संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपांतील ४०५ तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रलंबित आहेत. त्यांच्या निवारणाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.यूजीसीने विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘आॅनलाईन विद्यार्थी तक्रार निवारण पोर्टल’ सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा, आदींबाबत काही तक्रारी असल्यास त्या थेटपणे मांडण्यासाठी या पोर्टलची सुविधा यूजीसीने उपलब्ध करून दिली आहे. तक्रार आॅनलाईन नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते.
तक्रार नोंदविल्यानंतर त्याबाबतच्या कार्यवाहीची स्थिती त्यांना जाणून घेता येते. यावर स्मरण आणि स्पष्टीकरणाची सुविधा आहे. यूजीसीकडे आतापर्यंत देशभरातील ५३२ विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या ५८०३ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात महाराष्ट्रातील १० विद्यापीठे आणि एका शैक्षणिक संस्थेतील ४०५ तक्रारींचा समावेश आहे. त्यामध्ये परीक्षाविषयक मूल्यांकन आणि मानसिक छळ, आदी स्वरूपातील तक्रारींचा समावेश आहे.
राज्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस : २४१
- मुंबई विद्यापीठ : ७६
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ : २१
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : १९
- शिवाजी विद्यापीठ : १८
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : १०
- एसएनडीटी युनिव्हर्सिटी : ८
- सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्स : प्रत्येकी पाच
- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : प्रत्येकी एक
देशभरातील ३१०९ तक्रारींचे निवारणदेशभरातील एकूण १५१ विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतील ३१०९ तक्रारींचे निवारण झाले असून, त्यात महाराष्ट्रामधील ८७ तक्रारी आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठ (७४), भारती विद्यापीठ (६), सोलापूर विद्यापीठ (४) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी (३) यांचा समावेश आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्याचा यूजीसीचा प्रयत्न चांगला आहे. मात्र, तक्रारींचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यात प्रामुख्याने परीक्षाविषयक मूल्यांकन आणि महाविद्यालय, शिक्षण संस्था, विद्यापीठातील मानसिक छळ, आदींबाबतच्या तक्रारींचा समावेश असतो. स्वरूप वेगवेगळे असल्याने त्यांचे निवारण लवकर होणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन यूजीसीने या तक्रार निवारण प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करावे. त्याची जबाबदारी विद्यापीठांवर सोपावावी आणि यूजीसीने स्वत: लक्ष ठेवावे.- डॉ. अरुण आडसूळ, शिक्षणतज्ज्ञ
शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित असले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास विद्यापीठ प्रशासनाने गंभीरपणे विचार करून त्यावर मार्ग काढला पाहिजे. विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी अभ्यासक आहे. शिक्षण त्याचा अधिकार आहे, याची जाणीव महत्त्वाची आहे. उच्च शिक्षणामध्ये लालफितीचा अडथळा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सक्रिय होण्याची गरज आहे.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फाउंडेशन, कोल्हापूर.