कोल्हापूर : डिझेल दरवाढ, स्क्रॅप पाॅलिसी, ई-वे बिल, जीएसटी, थर्ड पार्टी विमा याबाबतची केंद्र सरकारची सध्याची धोरणे मालवाहतूकदारांना मारक असून, त्यातून हा व्यवसायच धोक्यात आल्यामुळे देशव्यापी चक्काजामचा सरकारला १४ दिवसांचा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रॅन्स्पोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरंगसिंग अटवाळ यांनी शनिवारी येथे दिली. कोल्हापूर जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सरकार आम्हाला संप करण्यास भाग पाडत आहे. सरकारशी चर्चा केली जाणार नाही. आता सरकारने थेट मागण्या मान्य कराव्यात. सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलतरंगसिंग म्हणाले, सरकारला मालवाहतूकदार डिझेल आणि करापोटी दिवसाकाठी ८ ते १० हजार कोटी रुपये देतात. आम्हीच जर १० ते १५ दिवस चक्काजाम केला तर कोट्यवधींचे सरकारचे नुकसान होईल. सरकार आमच्या जिवावर चालते. डिझेलचे भाव त्वरित कमी करून देशभरात एकच भाव करावेत. डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास १५ ते २० रुपयांनी दर कमी होईल. कोरोनामुळे सरकार आम्हाला मदत करेल असे वाटत होते. मात्र नेमके उलटे झाले आहे.
जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असाेसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर,विजय भोसले, विजय पाटील, बाबा चौगले, सतीश घाटगे, जयंत पाटील, विजय पोवार आदी उपस्थित होते.
चौकट
विमा रक्कम कमी करा...
ई-वे बिल म्हणजे भ्रष्टाचाराची कुरणे आहेत. माल वाहनांचा विमाही न परवडण्यासारखा केला आहे. देशभरातील रस्ते चांगल्या दर्जाचे आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे थर्ड पार्टी विमा प्रीमिअम कमी करावा.
२५ वर्षे करा..
वाहने भंगारात काढण्याचे धोरण चुकीचे आहे. ६० लाख वाहने मालवाहतुकीकरिता वापरली जातात. ती सर्व सुस्थितीत आहेत. सर्वच कसोट्यांवर ती तंदुरुस्त आहेत. त्यामुळे या धोरणात बदल करून १५ ऐवजी २५ वर्षे करावे. त्यानंतर तंदुरुस्तीनुसार त्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
फोटो : ०६०३२०२१-कोल-लाॅरी
आेळी : कोल्हापुरातील जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनला ऑल इंडिया मोटार ट्रॅन्स्पोर्ट काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली. यानिमित्त एआयएटीसीचे अध्यक्ष कुलतरंगसिंग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा, राज्य व देशपातळीवर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. (छाया : राज मकानदार)