कोल्हापूर : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर आणि परिसरात अत्याधुनिक अशी साउंड सिस्टीम बसविण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, तिरूपतीसारख्या देशातील अनेक देवस्थानांमध्ये अत्याधुनिक साउंड सिस्टीम असल्याचे मी पाहत होतो. आपल्या अंबाबाई मंदिरासाठी अशा पद्धतीची सिस्टीम आवश्यक असल्याचे मला वाटले. त्यानुसार सांस्कृतिक विभागाच्या सचिवांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ही योजना सांगितली.मी कोल्हापूर, तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिरांमध्ये ही योजना देण्यासाठी आग्रही होतो. मात्र महेश जाधव यांनी तातडीने कागदपत्रे उपलब्ध करून दिली. तुळजापूर आणि पंढरपूर येथून ती न मिळाल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. मात्र अंबाबाई मंदिरासाठीचे दीड कोटी रुपये देवस्थान समितीकडे जमा झाले आहेत.महेश जाधव म्हणाले, संभाजीराजे यांच्या प्रयत्नांमुळेच केंद्र शासनाचा पहिल्यांदा निधी अंबाबाई मंदिरासाठी मिळाला आहे. यातून चारही दरवाजे, गरूड मंडप, गाभारा आणि परिसरात जागतिक पातळीवरील साउंड सिस्टीम बसवविण्यात येईल. भक्तिगीते लावण्यापासून भाविकांना सूचना देण्यापर्यंत अनेक बाबींसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.कोल्हापूरकरांना इंदोरला नेणारसंभाजीराजे म्हणाले आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरामध्ये स्वच्छतेचे चांगले काम हाती घेतले आहे. महापालिका अधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना आपण देशातील सर्वांत स्वच्छ शहर असलेल्या इंदूरला भेट देण्यासाठी नेणार आहोत.