लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील (आसुर्ले-पोर्ले) येथील दत्त दालमिया साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उमेद फौंडेशनने उमेद डी केअर सेंटर सुरू केले आहे.या सेंटरचे उद्घाटन ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनचे अध्यक्ष अनिल श्रीधर नानिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंत शितोळे (चांगुलपणाची चळवळ ) यांनी मुलांना टोपी व साक्षी पन्हाळकर यांनी दिलेला खाऊ आणि शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते मुलांना वाटप करण्यात आले.
गेली चार वर्षे उमेद फौंडेशन आसुर्ले येथे ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून गेली चार वर्षे उमेद फौंडेशन शैक्षणिक चळवळ राबवत आहे. गरिबी किंवा जीवनातील संकटावर मात करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गरजू आणि शिक्षकापासून वंचित असणाऱ्यांसाठी उमेदने सुरू केलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अनिल नानिवडेकर यांनी केले.
याप्रसंगी दालमिया कंपनीचे प्रतिनिधी सचिन रणवरे, ॲड. अवधूत कोकाटे, नितीन कुरळुपे, सुरेश चेचर, उमेदचे अध्यक्ष प्रकाश गाताडे, सदस्य राजेंद्र चव्हाण, अजिनाथ डवरी, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन कुंभार, विक्रम म्हाळुंगेकर, प्रतीक चौगले, सरदार चौगुले, शिक्षिका सीमा दळवी, कोमल शिंदे, पालक उपस्थित होते.