लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुंबई येथील नगर दिवाणी व सत्र न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांना पुण्याच्या भारती विद्यापीठाची नुकतीच पीएच. डी. मिळाली आहे. ज्युडिशियल रिफॉर्म-इश्यूज ॲंड चॅलेंजेस असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांची ही सोळावी शैक्षणिक पदवी आहे. सतत नवीन काही तरी करण्याचा त्यांना ध्यास असून यापूर्वी कोल्हापुरात विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम करून दाखविले आहे.
मोरे मूळचे माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी गावाचे आहेत. त्यांनी माळशिरस तालुक्यात २००० ते २००४ मध्ये वकिलीची सुरुवात केली. दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग म्हणून ते राज्यसेवा परीक्षा २००४ मध्ये उत्तीर्ण झाले. तेव्हापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द उत्तरोत्तर अनेक महत्त्वाचे टप्पे पार करत आली आहे. कोल्हापुरात असताना त्यांनी तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम केले. सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थता आणि समेट समितीअंतर्गत ते देशपातळीवरील मध्यस्थ प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत नामांकित विद्यापीठांतून सोळा पदवी व पदविका प्रथम श्रेणी व विशेष प्रावीण्यासह मिळविल्या आहेत. पीएच.डी.साठी त्यांनी डॉ. उज्ज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला होता. आयुष्यभर शिक्षणाचा वसा सोडायचा नाही, असा त्यांचा निर्धार आहे.
(फोटो - ग्रंथालयातून घ्यावा)