कोल्हापूर : शहरासह आसपासच्या गावांतील भाविक रविवारी रात्री उशिरा एस. टी. आणि खासगी बसने येथील रेणुकादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेसाठी सौंदत्तीला (कर्नाटक) रवाना झाले. ‘उदं गं आई उदं’च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. यात्रेसाठी जाणाऱ्यांकडून भंडारा लावण्यात येत होता. बुधवारी (दि. ११) यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशीही काही भाविक सकाळी लवकर मार्गस्थ होणार आहेत.सौंदत्ती येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्री रेणुकादेवीची यात्रा असते. कोल्हापुरातून लाखांवर भाविक या यात्रेला जातात. ही यात्रा कोल्हापूरकरांचीच म्हटले तर वावगे ठरणार नाही. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचे बुकिंग अगोदरच करण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरातून मोठ्या संख्येने भाविक सौंदत्तीला रवाना झाले. बुधवारी मुख्य यात्रा असून, रात्री पालखीनंतर भाविक परतीच्या मार्गाला लागणार आहेत. गुरुवारी पहाटे या बसेस पुन्हा कोल्हापुरात दाखल होणार असून, ओढ्यावरील रेणुका मंदिरात दर्शन घेऊन भाविक आपापल्या घरी पोहोचणार आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरातील महालक्ष्मी रेणुका भक्त मंडळाचे सरचिटणीस गजानन विभूते व शोभा विभूते यांच्यातर्फे सर्व भक्तांना ड्रेस कोड देण्यात आला. माजी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते बसचे पूजन करून भाविक सौंदत्तीला रवाना झाले. यावेळी सुशांत विभूते, माधुरी विभूते, प्रशांत विभूते, मनोज पेटकर, मधुकर भोसले, प्रशांत पोवार, केरबा झोरे, संभाजी कुपटे उपस्थित होते.