कोल्हापूर : प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत विनाअनुदानित शिक्षकांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. २४) मंत्रालयामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राज्य (कायम) विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी बुधवारी दिली.
विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासह अन्य मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आमदार जयंत आसगावकर मुंबईला आले. त्यांनी याबाबत शालेय शिक्षणमंत्री गायकवाड, पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत चर्चा केली. त्यावर त्यांनी मंगळवारी बैठक घेण्याचे दूरध्वनीवरून आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या बैठकीतील चर्चेनंतर आंदोलनाबाबतची पुढील दिशा समिती ठरविणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर आणि मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीचा (उच्च माध्यमिक) वेतन निधी वितरणाचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे ५११ हेडसाठी ८० कोटी रुपये निधीच्या तरतुदीचा मार्ग मोकळा झाला आहे. माध्यमिक शाळांतील वेतन निर्गतीचा आदेश लवकरच शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात येईल, अशी माहिती आमदार आसगावकर यांनी दिली.